उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणार्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचे शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केले. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले होते. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी पकडताच विकास दुबे ‘मी कानपूरचा विकास दुबे’ आहे असं ओरडत होता. विकास दुबे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकास दुबे हरियाणामधून कसा पळाला याची माहिती अद्याप उघड झालेली नाही. एएनआयने विकास दुबेच्या अटकेचा व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये त्याने टी-शर्ट घातलेले दिसत आहे. मंदिरात जाण्याआधी त्याने पुजेचे सामान विकत घेतले होते. यावेळी दुकानदाराने त्याला ओळखले आणि सुरक्षा रक्षकांना सांगितले. विकास दुबे बाहेर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला विचारणा केली. यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि पोलिसांनी विकास दुबेला अटक केली. विकास दुबे याची सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची तसेच हाणामारीदेखील झाली. यानंतर त्याला पोलिसांकडे सोपवण्यात आले. 2 जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.